’वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', 'लालबाग परळ' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा' यांसारखी नाटकं, वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे वीणाने एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजले आहेत. 'पलतडचो मुनिस' हा तिची प्रमुख भूमिका असलेला कोंकणी चित्रपट यंदा बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरांटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचं पारितोषिक मिळालं.
माझं संपूर्ण कुटुंबच कलासक्त आहे. माझी आई शिक्षिका आहे, आणि ती उत्तम गाते. ती नाटकांत कामही करायची. माझे वडील चित्रकार आहेत. तबला वाजवतात. अशा वातावरणातच मी वाढले. अडीच वर्षांची असताना मी पहिलं नाटक केलं. मग पाच वर्षांची असताना एकपात्री अभिनयही केला. आईच्या कडेवर बसून. त्या वयात आपले पालक आपल्याला सांगतात की, असं असं कर, आणि आपण तसं करतो. तर तसं मी केलं आणि माझ्याही नकळत मला ते जमलं. लोकांना माझं काम आवडलं. आईबाबांना आवडलं. त्यानंतर मग आईबाबांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं. बाबा मला बालनाट्य शिबिरांमध्ये घेऊन जायचे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावायचे. मी रायगड जिल्ह्यातल्या उरण येथे राहते. तर तिथे असूनसुद्धा बाबा वेळोवेळी रजा घेऊन मला मुंबई, पनवेल, नवी मुंबई इथे होणार्या स्पर्धांसाठी घेऊन जायचे. उत्तम नाटकं बघायला आम्ही नेहमी मुंबईला जायचो. माझे अनुभव केवळ उरणपुरतेच मर्यादित राहू नयेत, म्हणूनही त्यांनी खूप प्रयत्न केले. मला नृत्याची आवड होती, म्हणून मला कथ्थक शिकायला पाठवलं. अभ्यास सांभाळून नाटक, नृत्य करायला मला आईबाबांनी कायम प्रोत्साहन दिलं.
तर अशी ही सुरुवात होती. दहावी झाल्यावर मी ठरवलं की, याच क्षेत्रात काहीतरी करायचं, कारण नाटकांत काम करणं मला मनापासून आवडत होतं. मला तेव्हा केंद्र सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळायची. सातवीपासून ते पदवीधर होईपर्यंत मला ती मिळणार होती. मात्र त्यासाठी दर दोन वर्षांनी मुलाखत द्यावी लागे. दहावीनंतर श्री. कमलाकर सोनटक्के यांनी माझी मुलाखत घेतली होती. 'मला अभिनयाची आवड आहे, नाटकांत काम करायचं आहे, मी काय करू?', असं मी त्यांना विचारलं होतं. तेव्हा त्यांनी मला मुंबईला येण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मग मी रुपारेल कॉलेजला प्रवेश घेतला. रुपारेल कॉलेज एकूणच सांस्कृतिक घडामोडींसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असताना मग मी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. मी आणि अद्वैत दादरकरनं एका युवा महोत्सवात शफाअत खानांची 'क' नावाची एकांकिका केली होती. तेव्हा मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते. या स्पर्धेसाठी चेतन दातार परीक्षक होता. मला आणि अद्वैतला अभिनयासाठीची सुवर्णपदकं मिळाली होती. चेतन दातारनं नंतर आमच्या नाटकाचा प्रयोग 'आविष्कार'ला ठेवला. मुंबईत येऊन तेव्हा मला दोन वर्षं झाली होती, आणि 'आविष्कार'मध्ये कसा प्रवेश मिळवायचा, याच धडपडीत मी होते. मला तारीखही लक्षात आहे, १० जुलै, २००३. माझा वाढदिवस होता त्या दिवशी आणि सुलभाताईंसमोर 'आविष्कार'च्या रंगमंचावर नाटक सादर करायचं, या विचारानेच खूप आनंद झाला होता.
त्यानंतर चेतननं 'जंगल में मंगल' हे नाटक केलं, तेव्हा त्यातली एक प्रमुख भूमिका मला दिली होती. शेक्सपीयरच्या 'अ मिडसमर नाईटस् ड्रीम'वर हे नाटक आधारित होतं. या नाटकाची मजा म्हणजे सर्व मुलांनी स्त्रीभूमिका केल्या होत्या, आणि सर्व मुलींनी पुरुषांची कामं केली होती. माझ्या व्यक्तिरेखेचं नाव 'पक्या' होतं, म्हणजे मूळ नाटकातला 'पक'. खूप एनर्जी असलेलं हे नाटक होतं. आम्ही बिनधास्त वागावं, स्त्री म्हणून वाटणारा सगळा संकोच झटकून टाकावा म्हणून चेतननं आमच्याकडून बरंच काम करून घेतलं होतं. तो सतत सांगायचा, 'हसा, उड्या मारा, पांचट जोक करा, लाजू नका'. नटाला शारीरिक, वैचारिक मोकळीक मिळावी लागते, हे मला या तालमींच्या वेळी कळलं. आपण फार संकोचतो, लाजतो. भूमिका करताना हा संकोच, लाज सगळं बाजूला सारता आलं पाहिजे, हे कळलं. त्यानंतर चेतनबरोबर मी 'खेळ मांडियेला' नावाचं नाटक केलं. चेतननं एका क्रोएशियन नाटकाचं हे भाषांतर केलं होतं. पं. सत्यदेव दुबे आणि सोनाली कुलकर्णी यांनी हे नाटक इंग्रजीत केलं होतं. मी आणि मंगेश भिडेनं ते मराठीत केलं. एक व्यावसायिक नाटकांतली मोठी अभिनेत्री आणि प्रायोगिक नाटकांचा दिग्दर्शक या दोन पात्रांचं हे नाटक होतं. ही भूमिका तशी कठीण होती. मी फक्त एकोणीस वर्षांची होते. चेतननं भाषांतर व दिग्दर्शन करताना अनेक खरे संदर्भ वापरले होते, अनेक खर्या अभिनेत्रींच्या लकबी मला दिल्या होत्या. त्या वेळी जशी पेलली तशी मी ती भूमिका केली, पण माझं कौतुक मात्र झालं होतं. या भूमिकेसाठी मला त्या वर्षी 'नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार' आणि 'मामा वरेरकर पुरस्कार' असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.
कॉलेजच्या तिसर्या वर्षात असताना मी माझा पहिला चित्रपट केला - 'बेभान'. आणि मग त्यानंतर 'चार दिवस प्रेमाचे', 'हीच ती दिवाळी', 'एक रिकामी बाजू' ही नाटकं केली. 'चार दिवस प्रेमाचे' हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक. 'सुयोग'सारखी संस्था आणि प्रशांत दामले, सविता प्रभुणे, अरुण नलावडे हे सहकलाकार. खूप मजा यायची हे नाटक करताना. 'एक रिकामी बाजू' या नाटकात माझ्याबरोबर गीतांजली कुलकर्णी होती. स्तनाचा कर्करोग झालेल्या एका तरुणीची ही कथा होती.
त्यानंतर आला 'वळू'. उमेशचा हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट होता, आणि चित्रपट बघताना हे कुठेही जाणवत नाही. खूप मोठ्या आणि उत्कृष्ट अशा कलाकारांबरोबर मला यात काम करता आलं. माझी भूमिका लहान होती, पण अनेकांच्या लक्षात राहिली. उमेशच्याच 'विहीर'मध्येही माझी भूमिका होती. 'विहीर' हा खरं म्हणजे दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. खूप वेगळा विषय होता या चित्रपटाचा. पौगंडावस्थेतली मुलं आणि मृत्यूशी झालेली त्यांची पहिली ओळख, हा विषय हाताळणं सोपं नाही. पण उमेशने किती सुंदर चित्रपट तयार केला! माझी भूमिका तशी लहान होती. सीमामावशी नावाची माझी व्यक्तिरेखा होती. खूप सोपी पण छान व्यक्तिरेखा होती ही. तिला लग्न करायचं नसतं, पण घरची माणसं तिला लग्न करायला लावतात. अनेकदा तुम्हांला न पटणार्या गोष्टी कराव्या लागतात, तसं सीमामावशीला लग्न करावं लागतं. काम करताना मला मजा आलीच, पण या चित्रपटात मी भूमिका केल्याचा मला अभिमान वाटतो, कारण अतिशय प्रगल्भ, सुंदर असा हा चित्रपट आहे. लेखन, दिग्दर्शन, छायालेखन या तीन गोष्टींसाठी हा चित्रपट प्रत्येकानं बघायलाच हवा.
उमेशप्रमाणेच सतीश मनवरच्या पहिल्या चित्रपटातही मी काम केलं. हा चित्रपट म्हणजे 'गाभ्रीचा पाऊस'. सतीश मूळचा विदर्भातला. यवतमाळचा. शेतकर्यांचं जीवन, त्यांच्या समस्या त्यानं जवळून पाहिल्या आहेत. 'गाभ्रीचा पाऊस' शेतकर्यांच्या आत्महत्यांवर भाष्य करतो. थोडा ब्लॅक कॉमेडीच्या अंगानं हा चित्रपट जातो. मी अंजना नावाच्या एका स्त्रीची भूमिका केली आहे. अंजनाचा नवरा चित्रपटाच्या सुरुवातीलाच आत्महत्या करतो, आणि या घटनेचा चित्रपटातल्या पुढच्या घटनांवर प्रभाव पडतो. चित्रपतासाठी सतीशनं आम्हां सर्वांना वैदर्भीय बोली शिकवली. ज्या गावात आम्ही चित्रीकरण केलं, तिथे अनेक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या होत्या. चित्रपटात माझं जे घर दाखवलं आहे, त्या घरच्या काकूंच्या बावीस वर्षांच्या मुलानं दहा हजार रुपयांच्या कर्जापायी आत्महत्या केली होती. त्या गावाची अवस्था खूप वाईट होती. पाणी नव्हतं. शेतात पाचसात फुटांच्या भेगा पडल्या होत्या. भयानक परिस्थिती होती तिथे. या चित्रपटामुळे एक व्यक्ती म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून माझ्यात खूप सकारात्मक बदल घडून आला. बरंच काही दिलं या चित्रपटाने मला.
'जन्म' हा माझा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही, पण यंदाच्या राज्य चित्रपट महोत्सवात अनेक नामांकनं या चित्रपटाला मिळाली होती. 'सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण निर्मिती'चा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला. आई आणि मुलीच्या नातेसंबंधांवर हा चित्रपट आधारलेला आहे. मुलीला रक्ताचा कर्करोग होतो, आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती आई किती धडपड करते, हे या चित्रपटात दाखवलं आहे. कर्करोग झालेल्या मुलीची भूमिका मी केली होती, आणि माझ्या आईच्या भूमिकेत रिमा लागू होत्या. माझ्या भूमिकेला खूप कंगोरे होते, आणि तशी कठीण होती. पण रिमा लागूंच्या अभिनयातून मला खूप काही शिकायला मिळालं. त्या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत, आणि त्यांच्याबरोबर इतकी मोठी भूमिका मला करायला मिळाली, याचं मला अतिशय समाधान आहे. 'लालबाग परळ' हा चित्रपटही मला खूप समाधान देऊन गेला. माझ्या कारकिर्दीच्या अतिशय योग्य अशा टप्प्यावर हा चित्रपट मला मिळाला. जयंत पवारांच्या 'अधांतर' या नाटकार हा चित्रपट बेतला आहे, आणि हे नाटक मी शाळेत असताना पाहिलं होतं. त्यातल्या मंजूच्या भूमिकेसाठी कुठलीही अभिनेत्री एका पायावर तयार झाली असती, इतकी सुंदर भूमिका आहे ती. जयंत पवारांनीच अगदी सुरुवातीला माझं नाव महेश मांजरेकर सरांना सुचवलं. या चित्रपटामुळे मला मांजरेकर सरांसारख्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करता आलं, शिवाय ही भूमिका इतकी सशक्त होती की, ती साकारताना माझा खरा कस लागला.
माझी भूमिका असलेल्या एका कोंकणी चित्रपटाला यंदा सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'पलतडचो मुनिस' (पलीकडचा माणूस) असं या चित्रपटाचं नाव आहे. गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या जंगलात आम्ही चित्रीकरण केलं होतं. एका वनरक्षक आणि वेड्या स्त्रीची ही गोष्ट आहे. वेड्या बाईची भूमिका मी केली आहे, आणि वनरक्षकाची भूमिका चित्तरंजन गिरीने केली आहे. अप्रतिम काम केलं आहे त्याने. हा सिनेमा अनेक महोत्सवांमध्ये गाजला. बर्लिन चित्रपट महोत्सवात आम्हांला खूप छान प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांकडून. टोरांटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचं खास परितोषिकही मिळालं. माझ्या कामाचंही बर्लिन आणि टोरांटोला अनेकांनी कौतुक केलं. ही माझी पहिली प्रमुख भूमिका.
नुकतंच मी अतुल पेठेंचं 'दलपतसिंग येता गावा' हे नाटक केलं. प्रायोगिक रंगभूमीवर अतुल पेठे गेली पंचवीस-तीस वर्षं अतिशय गांभीर्यानं नाटकं करत आहे. प्रखर सामाजिक भान असलेला तो एक रंगकर्मी आहे, आणि ते त्याच्या नाटकांतून दिसतं. गेल्या वर्षीपासून त्यानं एक छान उपक्रम सुरू केला आहे. जिथे नाटक अजून पोहोचलेलं, रुजलेलं नाही, जिथल्या नाटक करणार्या मंडळींना कसल्याच सोयी उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी जाऊन तो नाटक करतो. गेल्या वर्षी तो कणकवलीला गेला होता. तिथल्या मंडळींना घेऊन त्याने 'मी माझ्याशी' नावाचं नाटक बसवलं होतं. दिवाकरांच्या नाट्यछटांवर ते आधारित होतं. यावर्षी तो जालन्याला गेला. तिथे राजकुमार तांबडे नावाचा तरुण आहे. त्याची 'आकडा' नावाची एकांकिका फार गाजली होती. त्याने अतुलला जालन्याला बोलवलं आणि अतुलने तिथल्या रंगकर्म्यांबरोबर नाट्यशिबिरात एक नाटक बसवलं. माहितीचा अधिकार हा या नाटकाचा विषय होता. या नाटकात तिलोनियाच्या अरुणा रॉय यांची भूमिका करायला त्यांना एक अभिनेत्री हवी होती, म्हणून अतुलने माझ्याशी संपर्क साधला. खरं म्हणजे, या नाटकातला प्रत्येक कलाकार हा जालन्याचा असणार होता. पण या भूमिकेसाठी शहरी वागणंबोलणं असलेली अभिनेत्री हवी, म्हणून माझ्याकडे ही भूमिका आली.
अतुल मला म्हणाला, 'जालना मुंबईपासून बरंच लांब आहे. तुला दोन महिने इथे येऊन राहावं लागेल, तालमी कराव्या लागतील. या दोन महिन्यांत इतर कुठलाही चित्रपट किंवा नाटक तुला करता येणार नाही'. मी लगेच होकार दिला, कारण मलाही नवीन लोकांबरोबर, नवीन भागात नाटक करायचं होतं. मी जेव्हा व्यावसायिक नाटकांचे दौरे करायचे तेव्हा महाराष्ट्रातल्या नाट्यगृहांची अवस्था बघून वाईट वाटायचं. प्रेक्षकही फारसे नसत. तेव्हा वाटायचं, इथे नाटक करणार्या तरुणांची किती कुचंबणा होत असेल.. प्रत्येकालाच काही मुंबई-पुण्याला येणं शक्य नसतं. मग यांनी नाटक कसं करायचं? माझ्याकडे चालून आलेली ही संधी मी सोडली नाही. 'लालबाग परळ'चं चित्रीकरण झाल्यावर लगेच मी जालन्याला गेले. तिथे दीड महिना आम्ही तालीम केली, आणि २६ जानेवारीपासून आम्ही महाराष्ट्रभर आम्ही बरेच प्रयोग केले. तिरुवनंतपुरमला राष्ट्रीय नाट्यमहोत्सवातही आम्ही प्रयोग केला. या नाटकानं, अनुभवानं मला बरंच काही शिकवलं. आपण कायम आपल्याच कोशात असतो, आणि स्वत:बद्दल आपल्या फार अवास्तव कल्पना असतात. आपण फार उत्तम कलाकार आहोत, असं वाटत असतं, कारण आपलं खूप कौतुक होत असतं. पण प्रत्यक्षात तसं नसतं. महाराष्ट्रातल्या लहान गावांत खरंच खूप छान अभिनेते आहेत. पण त्यांच्या समस्या, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. शिवाय खूप मर्यादित अनुभवविश्व असतं आपलं. मुंबई-पुणे म्हणजेच जग, असं वाटत असतं. जालन्याला राहून तालीम केल्यावर माझ्यात बराच फरक घडून आला. अभिनेत्री म्हणून माझी समज विस्तारली.
सुदैवानं मला खूप ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ज्योतीमावशींबरोबर मी तीन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'विहीर', 'वळू', 'गाभ्रीचा पाऊस' या तिन्ही चित्रपटांत मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. त्यांचा अभिनय बघणं ही एक पर्वणी असते. 'गाभ्रीचा पाऊस'मधला त्यांचा अभिनय तर अप्रतिम आहे. इतका सुंदर अभिनय गेल्या अनेक वर्षांत पडद्यावर आला नव्हता. त्यांचं बोलणं, वावरणं, सगळंच अतिशय सुखद असतं. आणि मुख्य म्हणजे त्यांची व्यावसायिक निष्ठा. सुलभाताईंबरोबर मी 'आविष्कार'ला असताना काम केलं होतं. त्यांच्याकडून मी किती शिकले याला गणतीच नाही. डॉ. मोहन आगाशे सेटवर कायम उत्साही असतात. त्यांच्याशी गप्पा मारल्या की मनावर असलेला ताण लगेच दूर होतो. या वयातला त्यांचा उत्साह, आनंदी राहण्याचा स्वभाव बघितला की, मलाही आपोआप एनर्जी मिळते.
अतुल कुलकर्णीबरोबर मी 'वळू'मध्ये काम केलं होतं, आणि तो माझा खूप चांगला मित्र आहे, याचा मला अभिमान वाटतो. त्याच्याबरोबर अनेक विषयांवर मला बोलता येतं, त्याला मी कुठलीही समस्या सांगू शकते. त्याच्याशी बोललं की, आपले विचार स्पष्ट होत जातात. समाजाबद्दल, जगाबद्दल, नाटकाबद्दल, सिनेमाबद्दल त्याची ठाम मतं आहेत. तो खूप विचारपूर्वक जगतो, आणि हे त्याच्या वागण्यातून, अभिनयातून दिसतं. कलाकाराच्या वाट्याला आलेली प्रत्येकच भूमिका काही आव्हानात्मक वगैरे नसते. पण रिमा लागू, ज्योतीमावशी, सुलभाताई, अतुल कुलकर्णी यांच्यासारख्या कलाकारांबरोबर काम करायला मिळणं ही फार मोठी गोष्ट असते. त्यांचा अभिनय, त्यांचा सेटवरचा वावर, त्यांचं त्यांच्या सहकलाकारांबरोबरचं साधं, समंजस वागणंबोलणं यांतून खूप शिकायला मिळतं. यातून नकळत तुमच्यावर संस्कार होत असतात.
दुर्दैवानं ज्यांच्याबद्दल आजही लोक भरभरून बोलतात त्या डॉ. काशीनाथ घाणेकर, भक्ती बर्वे-इनामदार यांना मी रंगमंचावर पाहू शकले नाही. डॉ. श्रीराम लागूंचं 'मित्र' हे नाटक तेवढं बघता आलं. विजया मेहता, अरविंद देशपांडे यांची नाटकंही आता पाहता येत नाहीत. स्मिता पाटील यांचे चित्रपट पाहिले आहेत, पण त्यांना प्रत्यक्ष भेटायला, त्यांच्याशी बोलायला मला खूप आवडलं असतं. अमिताभ बच्चन आणि नासीरुद्दीन शाह यांचा अभिनय मी सतत पाहत असते, त्यांची मतं ऐकत असते आणि त्यातून शिकायचा माझा प्रयत्न असतो.
मी फार लहान वयात अभिनय करून लागले होते. मला नाटकं मिळत गेली, माझं कौतुक होत गेलं. पण त्यामुळे झालं काय की, माझा इतर क्षेत्रांशी संबंध खूप कमी झाला. आपलं इतर कशावाचून अडत नाही, हे मला लक्षात आलं, आणि ते काही फार चांगलं नव्हतं. माझा अभिनय चांगला होण्यासाठी असा संबंध तुटणं चांगलं नव्हतं, कारण कला आणि तुमचं आयुष्य हे वेगळं करता येत नाही. मग मी प्रयत्नपूर्वक स्वतःत बदल घडवायला सुरुवात केली. माझ्यात ही जी उणीव होती, ती दूर करायचा मी प्रयत्न केला. कारण तुमच्या अवतीभवती घडणार्या घटनांशी तुमची नाळ जोडली गेली की तुमचा अभिनय खुलतो. सशक्त अभिनय करायचा असेल तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींबद्दल जागरुकता असायला हवी. मी मघाशी सांगितलं तसं माझ्या सहकलाकारांकडून मी खूप शिकले आहे. यांपैकी बहुतेक सगळे कलाकार हे भरपूर वाचतात. त्यांच्याशी पुस्तकांबद्दल, राजकारणाबद्दल, उत्तम चित्रपट-नाटकांबद्दल बोलताना, त्यांची मतं ऐकताना खूप मजा येते. कारण माणूस म्हणून माझी वाढ व्हायला याचा फार उपयोग होतो, आणि ही वाढ मला माझ्या क्षेत्रात जास्त चांगलं काम करायला मला मदत करते. राजकारण, संगीत, इतिहास, भूगोल, अर्थकारण अशा अनेक विषयांची माहिती अभिनय करणार्याला असायला हवी. देशोदेशींचे चित्रपट तुम्ही पाहायला हवेत, संगीत ऐकायला हवं, पुस्तकं वाचायला हवीत, लोकांशी बोलायला हवं. वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगलं काम करणारे लोक असतात, त्यांच्या कामाबद्दल, संशोधनाबद्दल तुम्हांला माहिती असायला हवी. 'मला राजकारण आवडत नाही, मी पेपर वाचणार नाही', असं म्हणून चालत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर, देशात इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली तेव्हा आपला जन्मही झाला नव्हता. त्याबद्दल आपल्या वयाच्या मुलांना काहीच माहिती नसते. आणीबाणी का लादली गेली, फाळणी का झाली, ९२-९३ साली दंगली का झाल्या, हे जाणून घ्यायलाच हवं. आपल्या देशात फार मोठे बदल घडवून आणणार्या घटना का घडल्या, त्यांचा देशावर, आपल्यावर काय परिणाम झाला, किंवा होऊ शकेल, हे मला माहीत असायलाच हवं. उत्तम कपडे घालून वावरणं म्हणजे अभिनय नाही. तुम्ही रंगमंचावर किंवा पडद्यावर प्रेक्षकांना दिसता तेव्हा प्रेक्षकांना तुमची व्यक्तिरेखा खरी वाटली पाहिजे, आणि यासाठी बौद्धिक आणि मानसिक पातळीवर अभ्यास आणि मेहनत करणं अत्यावश्यक आहे. माणूस म्हणून तुम्ही कसे घडता यावर तुम्ही किती चांगला अभिनय करता, हे अवलंबून असतं.
मी स्वतःला फार नशीबवान समजते कारण माझ्या आईवडिलांचा मला पूर्ण पाठिंबा होता. किंबहुना त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी इथवर येऊ शकले. नाट्य-चित्रपटक्षेत्रात खूप संघर्ष करणारे अनेकजण मी रोज पाहते. कित्येकांना घरच्यांचा पाठिंबा नसतो म्हणून काम करता येत नाही. सुदैवानं माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. मी अगदी लहानपणापासून काम करत गेले, आणि मला चांगल्या भूमिका मिळत गेल्या. उत्तम नाट्यसंस्था, दिग्दर्शक, सहकलाकार मला लाभले. प्रेक्षकांनाही माझं काम आवडलं. यापुढेही असंच चांगलं काम मला करायला मिळावं, ही इच्छा अर्थातच आहे.
kupach chan aahe.
ReplyDeletemaan agadi bharun gelay,
he vachun.
thanks veena ....mala aavadale he tuje lekh vachun..aani me tula ek prasha vicharle hote ..te ya lekha madhe uttar milale ...?
ReplyDelete