Pages

Friday, August 19, 2011

वीणा जामकर यांना तन्वीर सन्मान



यंदा तन्वीर सन्मान सोहळ्याचं सातवं वर्षं होतं. पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती सुलभा देशपांडे यांना तन्वीर सन्मान आणि तरुण अभिनेत्री श्रीमती वीणा जामकर यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार श्री. नाना पाटेकर यांच्या हस्ते दिले गेले.

तन्वीर हा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांचा मुलगा. एका अपघातात सोळा वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. तन्वीरच्या जाण्याचं दु:ख बाजूला ठेवून त्याचा वाढदिवस साजरा करावा, अशी कल्पना पुढे आली, आणि तन्वीर सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली. दरवर्षी ९ डिसेंबरला, तन्वीरच्या वाढदिवशी, हा सोहळा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानातर्फे पुण्यात आयोजित केला जातो.


'वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', 'लालबाग परळ' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा', 'खेळ मांडियेला', 'जंगल में मंगल' यांसारखी नाटकं, वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणार्‍या वीणाने व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. आजपर्यंत तिने नऊ नाटकं, तेरा एकांकिका, दोन दीर्घांक आणि दहा चित्रपटांतून अभिनय केला आहे. 'आविष्कार' या नाट्यसंस्थेनं तिच्या नाट्यकारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजले आहेत. 'पलतडचो मुनिस' हा तिची प्रमुख भूमिका असलेला कोंकणी चित्रपट यंदा बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरंटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचं पारितोषिक मिळालं.

उत्स्फुर्तता, नैसर्गिक अभिनय आणि भाषेविषयीची विलक्षण जाण ही वीणाची बलस्थानं आहेत.


No comments:

Post a Comment